कर्नाटक निवडणूक निकालपूर्व आढावा

कर्नाटक निवडणूक निकालपूर्व आढावा

या चित्राच्या तसेच इतर माहितीच्या आधारे निघालेले काही महत्वाचे आणि काही मनोरंजक निष्कर्ष

  • येडियुराप्पांची घरवापसी

2013 सालच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपने बी एस येदियुराप्पाना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षातून काढून टाकले होते. त्यामुळे त्यांनी कर्नाटक जनता पक्ष स्थापन करून निवडणुका लढवल्या. याचा जोरदार फटका भाजपला बसला होता. यावेळी मात्र येडियुरप्पांची घरवापसी झाली आहे आणि कर्नाटक जनता पक्ष भाजपमध्ये विलीन झाला आहे. त्यामुळे कॉंग्रेसला याचा फायदा मिळणार नाही. याशिवाय बी श्रीरामुलूची बदावर स्रामिकारा राय्तारा कॉंग्रेस देखील भाजपमध्ये विलीन झाली आहे.

२०१३ मध्ये भाजप(४०), कजप(६) आणि BSRCP(४) या तिघांना मिळून ५० जागा मिळाल्या होत्या. या तिघांच्या मतांची बेरीज मात्र 90 जागांवर विजयी उमेदवाराच्या मतांपेक्षा जास्त होती. कजपा ३४ जागांवर दुसऱ्या स्थानावर होती. यावरून तीन पक्ष २०१३ मध्ये एकत्र लढले असते तर त्याना निदान ७५-८० जागा मिळाल्या असत्या (१०% मते उमेदवारांची वैयक्तिक संबंधातून मिळालेली मते धरल्यास). २०१३ मध्ये भाजप सरकारविरुद्ध प्रस्थापितविरोध (ANTI-INCUMBANCY) असूनही ८० जागा मिळाल्या असत्या, तर आता तो परिणाम नसताना आणि मोदी-शहा जोडीचे पाठबळ असताना भाजपची स्थिती मजबूत होणारच आहे.

  • शहरी विरुद्ध ग्रामीण

शहरी भागांची भाजपला नेहमीच साथ मिळत आली आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत मुंबई-नागपूर-पुण्यात त्यांना भरपूर यश मिळाले होते. गुजरात मध्ये देखील चार मोठ्या शहरातील (अहमदाबाद, सुरत, राजकोट आणि बरोडा) ५५ पैकी ४४ जागा जिंकून भाजपने बहुमत मिळवले होते. कॉंग्रेसने गुजरातेत १२७ ग्रामीण जागांपैकी ७२ जिंकूनही यशाने त्यांना हुलकावणी दिली. एका जंगी सभेचा किंवा एका मोठ्या मुद्द्याचा ५ ते ६ मतदारसंघांवर एकत्रित परिणाम होणे, सोशल व इलेक्ट्रोनिक माध्यमांचा प्रसार, विकासाचे आश्वासन आणि पारंपरिक संबंधांचा अभाव या गोष्टींचा भाजपला फायदा होतो असेच दिसते.

पण कर्नाटक मात्र याबाबतीत भाजपला कमी अनुकूल आहे. गुजरातेत १८२ पैकी ५५ (२८%) जागा शहरी भागात, ४ मोठ्या शहरात आहेत. कर्नाटकात मात्र २२४ पैकी ४० जागा(१८%) शहरीभागात आहेत आणि त्याही ८-९ ठिकाणात विखुरल्या आहेत. त्यामुळे एकगठ्ठा जागा जिंकण्याची शक्यता फक्त बंगलोर मधील २२ शहरी जागांत आहे. २०१३ मध्येही भाजपने शहरी भागात ४० पैकी ११ (२७ %) जागा जिंकल्या होत्या हेच प्रमाण ग्रामीण भागात १८४ पैकी २९ (१६%) एवढे घसरले होते. थोडक्यात, यश-अपयशात भाजपला शहरी भाग नेहमीच साथ देतो. त्यामुळे शहरीकरणाचा अभाव कॉंग्रेसच्या पथ्यावर पडू शकतो.

  • बालेकिल्ले आणि जेमतेम विजय

या विश्लेषणासाठी २००८ आणि २०१३ची विधानसभा निवडणूक तसेच २०१४च्या लोकसभा निवडणुकांचे आकडे गृहीत धरले आहेत. २०१३ च्या निवडणुकीत जोरदार फटका मिळूनही भाजपने २०१४ च्या लोकसभेच्या वेळी १३२ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मते मिळवली होती, यात मोदींचा प्रभाव, काँग्रेसवर रोष अशी अनेक कारणे आहेत. या पार्श्वभूमीवरच मागील तीन निवडणुकांच्या आधारावर मतदारसंघांचे भाजप-काँग्रेस  आणि जद(से) यांना अनुकुलतेनुसार वर्गीकरण करता येते. उदाहरणार्थ जे ३५ मतदारसंघ तिन्ही निवडणुकीत भाजपला मताधिक्य देत आहेत त्यांना भाजपचा बालेकिल्ला म्हणायला हरकत नाही. (dashboard पहा)

या चित्रात जितके डावीकडे सरकावे तितके भाजपचा प्रभाव वाढत जातो, उजवीकडे सरकताना कॉंग्रेसचा प्रभाव वाढत जातो तर वरती सरकताना जनता दलाचा प्रभाव वाढत जातो. वर्तुळाचा आकार त्या त्या प्रकारच्या जागांच्या संख्येशी समप्रमाणात आहे. काँग्रेसकडे २७ बालेकिल्ले आहेत तर जनता दलाकडे फक्त ७ बालेकिल्ले आहेत. या चित्राच्या मध्याकडे जसे सरकता तसे पक्ष आलटून पालटून विजयी होत जातात. dashboard वर कुठल्याही वर्तुळावर कर्सर नेऊन त्याचा प्रकार बघू शकता. क्लिक केल्यावर ते मतदारसंघ नकाशावर ठळक होउन दिसतील.

  • थोडक्यात जिंकलेल्या जागा

२०१३ च्या निवडणुकीमध्ये ७० जागा ७५०० पेक्षा कमी मताधिक्याने जिंकल्या गेल्या होत्या. यापैकी ३४ जागा कॉंग्रेसने, २० जागा भाजप-कजप ने आणि १० जागा जनता दलाने जिंकल्या होत्या. या जागांवर बदल होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यामुळे कॉंग्रेसची १२२ जागांसह सध्या मिळालेली आघाडी टिकेलच असे नाही. या कमी मताधिक्याने जिंकलेल्या जागावर सर्व पक्षांनी निवडणुकांदरम्यान विशेष लक्ष दिलेले आहेच आता निकालांच्या वेळीही त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष असेलच. dashbaord वर मताधिक्यचा स्लायडर वापरून तुम्ही या छोट्या फरकाने जिंकलेल्या जागा बघू शकता.

  • जनता दलाचा प्रभाव

नकाशात दाखवल्याप्रमाणे जनता दलाचा प्रभाव मुख्यत्वेकरून दक्षिण कर्नाटकात जास्त आहे. या भागात त्यांची लढत नेहमी काँग्रेसविरुध्द होत असते. २०१३ मध्ये जनता दलाच्या ४० जागांपैकी २६ जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे कॉंग्रेसच्या बहुमताच्या लक्ष्याच्या आड जदसे येणारच आहे. त्याप्रमाणेच ज्या ठिकाणी भाजप, काँग्रेस आणि जदसे या तिघानाही तुल्यबळ मते मिळाली आहेत (तिरंगी लढती) त्या ठिकाणी २०१३ मध्ये भाजपच्या ४० पैकी १७ (४२%) तर काँग्रेसच्या १२२ पैकी १५ (१२%) जागा आलेल्या आहेत. म्हणजेच तिरंगी लढतीमध्ये जदसे च्या ताकदीचा फायदा भाजपला झालेला आहे. कदाचित याच कारणामुळे राहुल गांधी जदसेला भाजपची B-team म्हणाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *